Wednesday, August 1, 2007

आज श्री ९ वर्षाचा झाला!!!!

आज श्री ९ वर्षाचा झाला!!!!

वेळ कसा उडून जातो कळत पण नाही आणी एक दिवस जाणवत आपल पिल्लू इतकं मोठं होउन गेलं कि कधी कधी आपल्यालाच ओळखू नाही येत।

श्री पण कधी इतका मोठा झाला की माझा पिल्लू नसून माझा मित्र झाला मला कळलच नाही। त्याच्या इतका समंजस, शान्त, आणी प्रेमळ मुलगा माझा आहे ह्यचा मला कधी कधी अत्यन्त गर्व होतो. कधी कधी तर वाटतं त्याला घडवण्यात माझा किव्हा प्रवीण चा काहीच वाटा नाही, तो स्वभावनेच तसा आहे.

त्याला माझे खूप खूप आशिर्वाद!!!

Tuesday, June 12, 2007

माझं पत्र माझ्या मुलाच्या गुरुजिना

आदरणिय गुरुजी,

खुप वर्ष आधी लिंकन ने तुम्हाला पत्र लिहिलं होतं,
आज एक आई तुम्हाला साद देत आहे

तुमच्या वर अविश्वास नाही, पण....
माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करताना मन जरा कचरत आहे

गुरूजी, तुम्ही माझ्या मुलाचं आयुष्य घडवणार आहात
तुम्ही त्याला सांगणार आहात
जगात भले बुरे सर्व लोक असतात
पण करु शकलात तेर येवढं करा
त्यातले विश्वास पात्र कोण हे समजण्याची दृष्टी त्याला द्या
जगात सगळेच विश्वास पात्र नसतात हे ही त्याला सांगा

तुम्ही त्याला सांगणार आहात
ज़गातल्या थोरा मोठ्यान बद्दल
पण करु शकलात तर येवढं करा
सगळ्यांच ऐकून ही आपलं स्वतंत्र मत बनवण्याची बुद्धी त्याला द्या
ऐकीव ज्ञान सदैव खरं नसतं हे ही त्याला सांगा

तुम्ही त्याला सांगणार आहात
चन्द्र सुर्य तारयां बद्दल बद्दल
पण करु शकलात तर येवढं करा
ह्या पृथवी वर पाय रोवून उभं रहाण्याची ताकद त्याला द्या
हवेत तरंगणार्यांच कोणी नसतं हे ही त्याला सांगा

तुम्ही त्याला शिकवणार आहात
गणिताची वजा बाकी,
पण करु शकलात तर येवढं करा
आपल्या माणसांच मोल त्याला कळेल
ही समज त्याला द्या
नात्यां मधे कसले ही हिशोब नसतात हे ही त्याला सांगा

तुम्ही त्याला शिकवणार आहात
जगाचा इतिहास, दाखवणार आहात भूतकाळ
पण करु शकलात तर येवढं करा
वर्तमानात जगण्याची धमक त्याला द्या
जुनं ते सगळच सोनं नसतं हे ही त्याला सांगा

गुरुजी तुम्ही त्याला जगातल सर्व ज्ञान देणार आहात,
त्याला शहाण बनवणार आहात,पण करु शकलात तर येवढं करा
हे सर्व करत असताना त्याला त्याच्या वयाला साजेलशी
दांडगाई ही करु द्या, हे निरागस वय परत येत नसतं

मला माहित आहे, मी खुप मोठं मागणं मागात आहे
पण गुरुजी त्याच्या साठी येवढं तर कराच
फार गोड, गोंडस, निरागस पोरगा आहे हो तो.

Wednesday, June 6, 2007

मी आई आहे ना म्हणुन............

कालच्या वर्जिनिया इन्सिडेन्ट वर सहज मनात आलेलं काही तरी:

तु झालास तेव्हा मी विचार केला
तु शाळेत जायला लागल्यवर मी दुपारी मस्त झोपत जाईन
पण तुझा अभ्यास आणी पोह्ण्याच्या क्लासेस च्या वेळा सम्भाळता सम्भाळता
माझी पूर्ण झोप उडाली

मग मी विचार केला
तु वरच्या वर्गात गेला कि मी मोकळी होइन मग दुपारची झोपेन
पण तुझं रात्र भर जागून अभ्यासात बुडणं पाहिल
आणी माझी ही झोप उडाली

तुला रात्रि २ वाजता चहा करुन देताना विचार केला
तु एकदाचा सिलेक्ट हो चांगल्या युनिव्हर्सिटीत
आणी जा अमेरिकेला
मग मी मस्त झोपेन आरामात

तु गेलास आणी घर रिकामं झालं
त्या रात्रि तुझी आठवण काढत मी उशी भिजवली
तेव्हा ही मला स्वस्थ झोप लागली नाही

आज समाचार पहाताना "ती" न्यु़ज़ पाहिली
आणी मी सम्पुर्ण हादरून गेले
तु सुरक्षित आहेस कळल्या वर ही
आज मला झोप लागली नाही

मी आई आहे रे बाळा
तु किती ही समजावलस तरी
तु घरी येई पर्यन्त
आता मला झोप लागायची नाही......

Tuesday, June 5, 2007

Pu La Chya Smruti Din nimmit....

पु. ल ना जाउन आज ७ वर्ष झालीत, पण ते गेलेत हे आज हि खर वाटत नाही. आज ही त्यान्ची उणीव भासत नाही कारण ते अता आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. परवा अपूर्वाई वाचताना त्यानी १९६० मधे लिहिलेल प्रवास वर्णन आज ही किती सटीक आहे हे त्यान अभिप्राय लिहून कळवावस वाटल आणी मनाला चटका लागला......अरे ते अता नाहीत!!!!!! एखादा मणूस अमर होतो म्हण्जे हेच काय?

पु.ल. मराठी माणसाच्या इतक्या परिचयाचे आहेत की त्यान्च्या बद्दल काही ही लिहिण म्हण्जे सग्ळ्याच गोष्टिन्ची पुनरावृत्तिच होते. अप्रतीम, जिनियस, बहुरन्गी सगळे सगळॆ विषेशण त्यन्च्या बाबतीत आता वापरून गुळगुळीत झाले आहेत. पु.ल जितक सुन्दर लिहायचे, तितकेच संगीत रसिक ही होते, भटकैये होते, आणी छान पैकी खादाड ही होते. त्यान्च्या साहित्या बद्दल काय लिहाव, पण त्यान्च्या लेखणीतुन एखाद्या मैफिलीच वर्णन वाचून सन्गीताचे तेच सुर ऐकु यायचा भास होतो. त्यानी केलेल्या एकाद्या मान्साहारी पदार्थाच वर्णन वाचून शुद्ध शाकाहारी माणसाच्या तोन्डाला सुद्धा पाणी सुटतं. त्यांचे प्रवास वर्णन वाचल्या नन्तर त्याच जागा स्वत: पाहिल्या तरी त्यान्च्या डोळ्याने पहात असल्याचा भास होतो.

ऎखाद्या व्यक्तिच आपल्या मधून निघून जाण आणी आपल्याला त्याची पदोपदि आठवण होण हा अनुभव प्रत्येका ल येतो, पण निघून जाणार्या व्यक्तिलाच निघून जाण्या बद्दल जाब विचारवासा वाटावा असे व्यक्ति आयुष्यात फ़ार थोडे येतात. पु.ल असेच एक व्यक्ति होते. प्रत्येक मरठी माणसाला त्यान्ना जाब विचारावास वाटतो की काय हो पु. ल. बटट्याच्या चाळीत तुम्ही आपली पुर्चुन्डी उघड्लीत, नस्ती उठाठेव करून आम्च्याशी मैत्री केलित, आम्हाला आम्च्या आयुष्यातले पुर्वरन्ग दाखवून त्यान्ची अपूर्वाई दाखवलीत, आम्चातल्या व्यक्ती आणी वल्लिची खिल्ली उडवलीत, आम्च्याशी अघळ-पघळ गप्पा करत आम्हाला आमचेच व्यन्गचित्र दाखवून आम्हाला असा मा असामी अस भासवलत, आणी हे सगळ करून आमची हसवणूक करत असताना आमची फसवणूक करून निघून गेलात? हे काही पटल नाही बुआ!

गेलेली व्यक्ति परत येत नसते म्हण्तात....पण पु.ल. ना म्हणावस वाटत परत या ना हो..... तुम्ही खरे कोण होता ते अजून ही आम्हाला कळल नाहीये. ऎक असामान्य माणूस की एक सामान्य गन्धर्व जो आम्हाला आमच्या धकाधकीच्या, धाव-पळीच्या आयुष्यात पण हसण्याच, आनन्दाचे दोन क्षण देवून निघून गेलात.

तुम्ही इतके आपले वाटता की तुम्ही जो वारसा ठेवून गेलात त्यसाठी धन्यवाद म्हणायचा परकेपणा करावासा वाटत नाही. तुम्हाला शतश: नमन.